Home मनोरंजन ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

0

कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अजोड नातं आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने नात्यांचे बंध जपत उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी संधी असूच शकत नाही. याच गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन ‘घरत गणपती’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

नातेसंबंधातील प्रेम, गोडवा सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होत असतो. हाच धागा घेऊन सर्वांगसुंदर अशी ‘लंबोदर’ कथा ‘घरत गणपती’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कोकणातल्या एका सुखवस्तू कुटुंबातील ही गोष्ट आहे. घरातील गणपतीच्या निमित्ताने घरत कुटुंबात घडणाऱ्या सहज-साध्या गोष्टी, ज्यात गमतीजमती आहेत, राग-लोभ आहेत, एकमेकांविषयी वाटणारी माया आहे.

चित्रपटाला साजेशी चार गाणी चित्रपटात असून ‘माझा कोकण भारी’ आणि ‘नवसाची गौराई माझी’ या गाण्यांना सोशल माध्यमावर उत्तम प्रतिसाद मिळतोय. श्रद्धा दळवी, समीर सामंत,अलोक सुतार यांनी लिहिलेल्या गीतांना जावेद अली, विशाल ददलानी, अभय जोधपूरकर, सायली खरे, ‘द कोकण कलेक्टिव्ह’ गर्ल्स यांनी स्वरबद्ध केलं आहे.

‘घरत गणपती’ हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल असा विश्वास व्यक्त करताना नात्यांचा हा प्रवास प्रत्येकाला समृद्ध करेल, असं दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी सांगितलं.

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here