Home महाराष्ट्र शासन मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0

जिल्ह्यात छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४ जाहीर झाला असून नागरिकांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे.

पुनरीक्षण मोहीम कालावधीत नवीन मतदारांची नाव नोंदणी करणे, मयत मतदारांचे, स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे आदीसारखे कार्यक्रम राबविले जातील. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत ऑनलाईन नावनोंदणीसाठी किंवा तपशीलात बदल करण्यासाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपला भेट द्यावी. ऑनलाईन अर्जाची प्रत मतदार नोंदणी अधिकारी किंवा तहसील कार्यालयात सादर करता येईल.

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घ्यावा. तसेच मतदार नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here