Home भारत सरकार रशिया आणि ऑस्ट्रिया या देशांच्या अधिकृत दौऱ्यासंदर्भात पंतप्रधानांचे प्रस्थान निवेदन

रशिया आणि ऑस्ट्रिया या देशांच्या अधिकृत दौऱ्यासंदर्भात पंतप्रधानांचे प्रस्थान निवेदन

0

येत्या तीन दिवसांत रशिया येथे आयोजित 22व्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तसेच माझ्या पहिल्याच ऑस्ट्रिया भेटीसाठी मी रवाना होत आहे.

उर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर देवाण घेवाण या क्षेत्रांसह इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि रशिया या देशांदरम्यान असलेल्या विशेष आणि विशेषाधिकारसहित धोरणात्मक भागीदारीने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत मोठी प्रगती केली आहे.

माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह या द्विपक्षीय भागीदारीच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांबाबतचे दृष्टीकोन सामायिक करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. शांत आणि स्थिर प्रदेश घडवण्यासाठी आम्ही आश्वासक भूमिका निभावू इच्छितो. या दौऱ्यामुळे मला रशियातील उत्साही भारतीय समुदायाला भेटण्याची संधी देखील मिळणार आहे.

ऑस्ट्रिया भेटीदरम्यान मला राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डर बेलेन तसेच चँन्सेलर कार्ल नेहम्मर यांना भेटण्याची सुसंधी प्राप्त होणार आहे. ऑस्ट्रिया हा भारताचा भक्कम तसेच विश्वासू भागीदार आहे आणि उभय देश लोकशाही तसेच बहुलवादाचे आदर्श सामायिक करतात.

भारताच्या पंतप्रधानांची गेल्या 40 वर्षांच्या काळातील ही पहिलीच ऑस्ट्रिया भेट असणार आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञान तसेच शाश्वत विकासासह इतर अनेक नव्या आणि उदयोन्मुख  क्षेत्रांमध्ये उभय देशांदरम्यान असलेली भागीदारी आणखी नव्या उंचीवर घेऊन जाण्यासंदर्भातील चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे. परस्पर लाभदायी व्यापार आणि गुंतवणूक विषयक संधींचा शोध घेण्यासाठी ऑस्ट्रियाच्या चँन्सेलर महोदयांसह, दोन्ही देशांतील व्यापार क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींशी विचारांची देवाणघेवाण करण्याबाबत मी अतिशय उत्सुक आहे.  व्यावसायिकता तसेच वर्तणूक यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रियामधील   भारतीय समुदायाशी सदर दौऱ्यादरम्यान मी संवाद साधणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here