Home Uncategorized डीआरडीओने तंत्रज्ञान विकास निधी योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रातील उद्योगांसाठी सात नव्या प्रकल्पांना दिली...

डीआरडीओने तंत्रज्ञान विकास निधी योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रातील उद्योगांसाठी सात नव्या प्रकल्पांना दिली मंजुरी

0

संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील उद्योग विशेषतः एमएसएमईज आणि स्टार्ट-अप्सची जोपासना करण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

आत्मनिर्भरतेला नवी चालना देत डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने सशस्त्र दले आणि अवकाश तसेच संरक्षण क्षेत्राच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान विकास निधी योजनेअंतर्गत उद्योगांना सात नवे प्रकल्प वितरीत केले आहेत. प्रकल्पांना देण्यात आलेली ही मंजुरी म्हणजे देशातील उद्योगांची, विशेषतः एमएसएमईज आणि स्टार्ट-अप्सची जोपासना करण्याच्या डीआरडीओतर्फे सुरु असलेल्या प्रयत्नांचा पुरावाच आहे. सदर तंत्रज्ञानांचा स्वदेशी पद्धतीने विकास आपल्या देशाच्या लष्करी उद्योग परिसंस्थेला बळकटी देईल.मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

स्वदेशी परिदृश्य आणि संवेदक अनुकरण टूलकिट

या प्रकल्पात वैमानिकांच्या सिम्युलेटर अर्थात अनुकरण प्रशिक्षणासाठी स्वदेशी टूलकिटच्या विकासाचा अंतर्भाव आहे. या प्रकल्पामुळे मोहिमेचे संपूर्ण प्रशिक्षण आणि मोठ्या प्रमाणात सेनेच्या सहभागाला मदत होणार आहे. हा प्रकल्प नोईडास्थित ऑक्सिजन 2 इनोव्हेशन या खासगी  स्टार्ट-अप ला मंजूर झाला आहे.

पाण्याच्या पृष्ठभागाखाली संचालित मानवविरहीत एरियल व्हेईकल

बहुविध लढाऊ भूमिका पार पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अष्टपैलू सागरी लढाऊ उपकरणांशी हा प्रकल्प संबंधित आहे. हेरगिरी, पाळत आणि टेहळणी (आयएसआर) तसेच सागरी क्षेत्रातील जागरुकता (एमडीए) साध्य करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा प्रकल्प पुण्याच्या सागर डिफेंन्स इंजिनियरिंग या खासगी कंपनीला देण्यात आला आहे.

शोध आणि निष्क्रियीकरण यासाठी दीर्घ पल्ल्याची, दूर अंतरावरुन संचालित वाहने

ही उपकरणे दुहेरी वापरासाठी आहेत, ही उपकरणे पाण्याच्या पृष्ठभागाखालील वस्तूंचा शोध, वर्गीकरण, स्थानशोधन तसेच निष्क्रियीकरण करणे शक्य करतीलच पण त्याचसोबत महत्त्वाची सामग्री संशयित परिचालन क्षेत्रापासून दूर ठेवतील. हा प्रकल्प कोची स्थित आयआरओव्ही टेक्नोलॉजीज या खासगी क्षेत्रातील स्टार्ट-अप ला देण्यात आला आहे.

विमानांसाठी बर्फाचा शोध घेणाऱ्या संवेदकाचे विकसन

हा प्रकल्प विमानांच्या बाह्य भागावर अतिशीत झालेल्या पाण्याचे तुषार आदळल्यामुळे विमानावर निर्माण होणाऱ्या हिमसदृश स्थितीचा शोध घेण्यासाठीचे उपकरण विकसित करण्याविषयी आहे. विमानातील बर्फविरोधी यंत्रणा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून या उपकरणाचा उपयोग केला जाईल. हे उपकरण विकसित करण्याचा प्रकल्प बेंगळूरू येथील क्राफ्टलॉजिक लॅब्स या कंपनीला देण्यात आला आहे.

ॲक्टिव्ह अँटेना ॲरे सिम्युलेटरचा विकास

हा प्रकल्प बहुविध लहान पल्ल्याच्या हवाई शस्त्र प्रणालीची चाचणी तसेच मूल्यमापनासाठी विविधांगी लक्ष्य यंत्रणेचा वापर करून घेणे शक्य करेल. मोठ्या क्षमतेच्या रडार यंत्रणांसाठी हे उपकरण मुलभूत उभारणी सामग्री म्हणून कार्य करेल. चेन्नई येथील डाटा पॅटर्न (इंडिया) या कमानीला हे काम सोपवण्यात आले आहे.

भारतीय प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणाली-आधारित कालसंपादन आणि प्रसार प्रणालीचे विकसन

हे काम बेंगळूरू येथील ॲकॉर्ड सॉफ्टवेअर अँड सिस्टिम्स या खासगी कंपनीला देण्यात आले आहे.काळ संपादन आणि प्रसार प्रणालीचे स्वदेशीकरण करणे, काल संपादनासाठी भारतीय नक्षत्र प्रणालींचा वापर तसेच पल्ल्यांच्या आवश्यकतेनुसार विविक्षित आणि लवचिक काल यंत्रणा विकसित करणे हे या प्रकल्पाचे उद्देश आहेत.

अंगावर घालता येण्याजोग्या बहुकार्यकारी साधनांसाठी ग्राफिन आधारित स्मार्ट आणि ई-वस्त्रांचे विकसन

कोईम्बतूर येथील अलोहाटेक या स्टार्ट-अप ला हे काम देण्यात आले आहे. यामध्ये ग्राफिनचे नॅनोसाहित्य आणि प्रवाहकीय शाईचा वापर करून प्रवाहकीय तागे आणि कापड तयार करण्याची प्रक्रिया विकसित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यातून व्यावहारिक वापराच्या कापडी साधनांसाठी जन्मजात फायद्यांचा वापर करून प्रगत नॅनोकॉम्पोझिट साहित्यावर आधारित ई-वस्त्रे विकसित होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here