मनुस्मृती हे वैदिक संविधान: पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज
पुण्यात तीन दिवसीय दीक्षा व संगोष्टी कार्यक्रम
Pune :- काळानुसार सनातन सिद्धांताला जगाला मानावेच लागेल. सुसंस्कृत, सुरक्षित, सुशिक्षित, संपन्न हे हिंदू राष्ट्राचे स्वरूप आहे. वैदिक संविधानाचे नाव मनुस्मृती आहे. जीवनाचे सार्थक करण्यासाठी मनू ने जे काही सांगितले त्याचे पालन केले पाहिजे. फक्त पोट आणि परिवारापर्यंत हिंदूंनी मर्यादित राहायला नको. तरच त्यांना योग्य तो सन्मान मिळेल, असे मत पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीमज्जगुरु पुरी शंकराचार्य स्वागत समिती, पुणे तर्फे बी.टी. कवडे रस्त्यावरील मियामी टेरेस येथे पत्रकार संवाद व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यामध्ये तीन दिवसीय दीक्षा व संगोष्टी कार्यक्रम दि.२० डिसेंबर पर्यंत सकाळी ११.३० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मियामी टेरेस, बी.टी. कवडे रस्ता येथे शंकराचार्य महाराज उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज म्हणाले, हिंदू राष्ट्र होणे शक्य आहे. कारण आपले पूर्वज हे सनातनी वैदिक आर्य हिंदू होते. त्यामुळे भारत देशाला हिंदू राष्ट्र बनण्यासाठी कोणतीही अडचण नाही. भारत विश्वगुरू आहे. संयुक्त राष्ट्र सारख्या संघटनाही त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतात येतात. त्यामुळे भारत हा विश्वगुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
अमर्यादित महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी नरेंद्र मोदींना नितीश आणि नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालावे लागत आहे. त्यांना आता सांभाळण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.