Ajit Pawar – महायुतीत होत असलेल्या कोंडीमुळे अजित पवार गटाचा आक्रमक पवित्रा
मुख्यमंत्री पदावरून पवारांची मागणी
महायुतीमधील मुख्यमंत्रीपद तीनही घटक पक्षांना आलटून-पालटून दिले पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार प्रफुल पटेल यांनी या मागणीचे खंडन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अजित पवारांनी ही अट घातल्याचे समजते.
मात्र, अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मागणीचा मुद्दा फेटाळला. ‘शहांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. हा मुद्दादेखील उपस्थित झाला नाही’, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. ‘महायुतीतील तीनही घटक पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असून एकमेकांमधील समन्वय वाढवण्यावर चर्चेत अधिक भर देण्यात आला होता’, असेही पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न विचारण्यात आला असता, त्यावर भाजपचे संसदीय मंडळ हे ठरवेल असे त्यांनी नमूद केले, मात्र फिरते मुख्यमंत्रीपद शक्य नसल्याचे सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर सभा तसेच प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्येही अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची मनीषा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असूनही त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले आहे.