Assembly Elections : १०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचं वेध लागलं आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात निवडणूक होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागेल असं भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपावर बैठक होणार आहे. काँग्रेस पक्ष सध्या व्यस्त आहे तरीही जागावाटपाचा लवकर तोडगा काढला पाहिजे. काँग्रेस नेत्यांना आम्ही बैठकीचं आमंत्रण दिलंय. ते इतके व्यस्त आहेत त्यामुळे तारखावर तारखा देत आहेत. त्यामुळे आज आम्ही ठरवलंय, काहीही झालं आजपासून ३ दिवस आम्ही चर्चा करू असं त्यांनी म्हटलं, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.
पुढील २ दिवसानंतर जागावाटपावर युतीच्या बैठका सुरू होतायेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पहिली बैठक होईल. या बैठकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी किती जागा लढवणार याचा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर येत्या ८ दिवसांत काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बैठकांना वेग आला आहे. युतीबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि घोषणाही करतील अशी माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली.
त्याचसोबत, राज्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यासोबत आता तिसऱ्या आघाडीचीही बैठक होणार आहे. आमची तिसरी आघाडी नसून महाशक्ती असेल, ही जनतेची शक्ती असेल. याबाबत उद्या आमची बैठक आहे. राजू शेट्टी, संभाजीराजे, राजरत्न आंबेडकर आणि काही मुस्लीम संघटनांशी आमची चर्चा आहे. या बैठकीत वैचारिक मुद्दे स्पष्ट होतील त्यातून आम्ही निवडणुकीला सामोरे जावू अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.