महाराष्ट्र शासन

Dr. Suhas Diwase – ग्रामपंचायती व शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा

PUNE :- गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा यांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय गड किल्ले बनविणे स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायत व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

या स्पर्धेत गडकिल्ल्यांची आकर्षक, ऐतिहासिक दृष्टीकोनातून तयार केलेली प्रतिकृती, गाव व शाळा स्तरावर गडकिल्ले यांचे जतन, संवर्धन व स्वच्छता बाबत राबविण्यात येणारे अभिनव उपक्रम व कार्यक्रम, माहितीपट, पारंपरिक नाणी, शस्त्र, भांडी आदी संग्रहाचे प्रदर्शन, ग्रामपंचायत अथवा शाळेमध्ये उपलब्ध असणारे शिवचरित्र, गडकिल्ले, मराठा साम्राज्याशी ऐतिहासिक व संदर्भिय साहित्य, गावस्तरावर घेण्यात आलेल्या शिवचरित्र, गडकिल्ले, ऐतिहासिक व संदर्भिय स्पर्धा, व्याख्याने, गावामध्ये शिवकालीन पारंपारिक साहसी खेळांच्या स्पर्धा, प्रदर्शन, लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन आदी विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.

जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक विजेत्यास ५ लाख, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार तर तृतीय क्रमांकास १ लाख २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. याव्यतिरिक्त उत्कृष्ट पद्धतीने सहभागी होणाऱ्या ५ गावांनादेखील जनसुविधा, नागरी सुविधा या योजनांतर्गत प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.

तालुकास्तरीय प्रथम क्रमांक विजेत्यास १ लाख, द्वितीय क्रमांकास ५० हजार तर तृतीय क्रमांकास २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. याशिवाय उत्कृष्ट पद्धतीने सहभागी होणाऱ्या ५ गावांना जनसुविधा, नागरी सुविधा या योजनांतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल.

स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी, स्पर्धेचे परिपूर्ण अर्ज संबंधितांनी जिल्ह्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात १८ ते १९ सप्टेंबरपर्यंत सादर करावेत.

अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील गटशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button