महाराष्ट्र शासन

DY CM Ajit Pawar – राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारानुसार राज्य शासन सर्व समाजघटकांच्या विकासासाठी कार्यरत

ऑनलाईन पद्धतीने ‘सारथी’च्या मुख्य इमारतीचे उद्घाटन

PUNE :- महाराष्ट्र आणि देशाला सामाजिक न्यायाचा कृतिशील विचार देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श आणि विचार समोर ठेऊन राज्यातील सर्व समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन काम करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी या संस्थेच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास दूरदृष्य प्रणालीद्वारे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, संचालक नवनाथ पासलकर आदी उपस्थित होते. पुणे येथे संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपव्यवस्थापक अनिल पवार आदी उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे बहुजनांना शिक्षणासाठी दारे खुली करणारे, जातीभेद निर्मूलनासाठी कृतिशील पाऊल उचलणारे लोककल्याणकारी राजे होते, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, करवीर संस्थानात मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवणारे शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने आरक्षणाचे जनक होते. त्यांनी स्त्रीयांच्या कल्याणासाठी कायदे केले. शिक्षणातील एका ठराविक वर्गाची मक्तेदारी मोडीत काढून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षण संस्थांची स्थापना केली, त्यांना आर्थिक मदत केली. जाती निर्मूलनाचे प्रयत्न केले.

छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराच्या पायावर देशाची लोकशाही भक्कमपणे उभी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा देशाच्या राज्यघटनेत समावेश केला असून राज्यघटनेवर शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणाचे प्रतिबिंब दिसून येते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेशी ही संस्थेची इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचे उद्घाटन करून आपण राजर्षी शाहू महाराज यांना कृतिशील वंदन करत आहोत. या संस्थेच्या इमारतीला साजेसे काम संस्थेकडून व्हावे. मुलांची निवड गुणवत्तेनुसार व्हावी, कोणताही पक्षपात होता कामा नये, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती शाहू महाराजांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या समाज बांधवांच्या उन्नतीसाठी सारथीची निर्मिती केली. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे, कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे काम करण्यात आले आहे. या कामाला अधिक गती देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सारथीच्या विभागीय कार्यालयांसाठी सर्वांच्या प्रयत्नातून चांगल्या ठिकाणी जमीनी उपलब्ध करुन देऊन इमारतींचे काम सुरू झाले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

या संस्थेप्रमाणेच विविध समाजघटकांच्या प्रगतीसाठी बार्टी, महाज्योती, अमृत, मार्टी, आर्टी, टीआरटीआय, वनार्टी अशा वेगवेगळ्या संस्थांसोबतच अनेक समाजांच्या विकासासाठी महामंडळे सुरू केली आहेत. या संस्था आणि महामंडळांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. छत्रपती शाहू महाराज यांचे विचार स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून पोहोचवायचे आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

सारथीचे अध्यक्ष श्री. निंबाळकर म्हणाले, प्रारंभी मराठा, कुणबी समाजातील अधिकाधिक विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षातून निवड  व्हावी, पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना मदत करणे हा उद्देश होता. त्यापुढील काळात अन्य केंद्रीय व राज्य शासनातील सेवा, आयबीपीएस, निमलष्करी दले यातील नियुक्त्यांसह कृषी, सेवा क्षेत्र, सनदी लेखापाल आदी वर भर दिला.

संस्थेने कौशल्य विकास प्रशिक्षण वर भर दिला. एमकेसीएल, केंद्र शासनाची औरंगाबाद येथील संस्था येथून कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याशिवाय ९, वी १२ वी मध्ये मेरिट कम मीन्स शिष्यवृत्तीतील कोटा पद्धतीमुळे पात्र असूनही वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. याचा लाखो विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. सारथीच्या आठ सारथी विभागीय मुख्यालयातील वसतिगृहांचा लाभ मराठा व लक्ष्यित घटकासह अन्य समाजातील मुलांनाही प्रवेश मिळणार आहे. फक्त नोकरीकडे लक्ष न देता भविष्यात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार  सुरू करता यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी अशोक काकडे यांनी सारथीच्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संस्थेच्या कामकाजाची चित्रफीत, इमारतीची वैशिष्ट्ये दर्शविणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button