महाराष्ट्र शासन

DY CM Ajit Pawar – व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील

BARAMATI :- बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासात व्यापारी वर्गाचे मोलाचे योगदान असून व्यापारी वर्गाशी निगडीत प्रलंबित प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती व्यापारी महासंघ आणि दि बारामती मर्चंट असोसिएशनच्यावतीने सोमवारी (दि. ७ ऑक्टोबर) रात्री आयोजित व्यापारी मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते. बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, संस्थापक नरेंद्र गुजराथी, दि बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, शहर व परिसरात आगामी ५० वर्षाचा विचार करुन सार्वजनिक विकास कामे सुरू आहेत. नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याकरीता रुग्णालयाची उभारणी, रस्ते, पूल, सेवा रस्ते, कालवा सुशोभीकरण, नदी सुधार कार्यक्रम, क्रीडासंकुल इमारत, दशक्रिया विधी घाट, पाण्याची साठवण व्यवस्था, श्रीमंत बाबू नाईक वाडा परिसर सुशोभीकरण, नवीन भाजीपाला विक्री केंद्र, वनसमृद्धी कण्हेरी वनोद्यान आदी विकास कामे सुरू आहेत. शहराचा विस्तार होत असताना नागरिकांना वाहतुकीची शिस्त पाळावी लागेल.

बारामतीच्या एमआयडीसीत ५० एकर जागेत २ हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प येणार आहे. त्यातून परिसरातील दीड हजार मुलांना रोजगार उपलब्ध होईल. त्याबाबत मंत्रालय स्तरावरील यंत्रणेला सूचना दिल्या असून तात्काळ सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन काम करीत असून नागरिकांनी जबाबदारीने त्यांना सहकार्य करावे. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, परिसरात गुंडगिरी, दादागिरी, दहशत  खपवून घेतली जाणार नाही, कायदाचा भंग करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे पोलीस यंत्रणेला निर्देश दिले आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

आगामी काळात सार्वजनिक विकास कामांच्या माध्यमातून बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासोबतच परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सर्वांच्या सहकार्याने सर्वांग सुंदर बारामतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button