Election Expenditure Inspector Rama Nathan R : नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी
निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला विधानसभा निवडणुकीचा आढावा
DHULE :- धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाची निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे निर्देश पाचही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाने धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून रामा नाथन आर यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे धुळे येथे आगमन झाले असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्वाती काकडे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वराजंली पिंगळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडीत यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. निवडणूकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चावर नोडल अधिकारी तसेच सहाय्यक खर्च निरीक्षकांनी लक्ष ठेवून दैनंदिन अहवाल विहीत वेळेत सादर करावेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचे मूल्यमापन करण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित करावा. तसेच सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सहाय्यक खर्च निरीक्षकांक्षी समन्वय ठेवावा, माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या, जाहिरातींवर एमसीएमसी कमिटीने बारकाईने लक्ष ठेवावे, पक्ष व उमेदवारांच्या प्रत्येक प्रचार जाहिरातींचा समावेश खर्चात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नलावडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. धिवरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वराजंली पिंगळे यांनी आपल्या विभागाची माहिती पीपीटीद्वारे दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी प्रास्ताविकात धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाच्या रचनेविषयी माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गावंडे यांनी आभार मानले. बैठकीस आयकर, वस्तु व सेवा कर विभागाचे उपायुक्त, बँक, रेल्वे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
माध्यम सनियंत्रण समितीने पेड न्यूजवर बारकाईने लक्ष ठेवावे
भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीत माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची भूमिका महत्वाची आहे. या समितीने माध्यमांचे सनियंत्रण करताना पेड न्यूजवर बारकाइने लक्ष ठेवावे, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी आज दिले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता धुळे जिल्ह्यातील पाचही विधान मतदारसंघासाठी जिल्हा माहिती कार्यालयात पहिल्या मजल्यावर माध्यम नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या मीडिया सेंटरला आज सकाळी निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी विलास बोडके, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक श्री. रामा नाथन आर म्हणाले, निवडणूक कालावधीत पेड न्यूजवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. पेड न्यूज आढळून आल्यास तत्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी. समितीच्या निर्णयानुसार पेड न्यूजचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करावा. तसेच स्थानिक केबल नेटवर्कवरील पेड न्यूज, जाहिरातींचेही सनियंत्रण करावे. सोशल मीडियावर पाचही विधानसभा निवडणूकीत ऊभे राहणाऱ्या उमेदवाराच्या फेसबुक, एक्स, इन्स्ट्राग्राम तसेच इतर सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या जाहिराती, पोस्टवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा माहिती अधिकारी तथा मिडीया कक्षाचे नोडल अधिकारी श्री. बोडके यांनी मीडिया सेंटरच्या कामकाजाची माहिती दिली. मिडीया कक्षातील कामकाजाबाबत निवडणुक खर्च निरिक्षक यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कक्षात उपसंपादक संदीप गावित, वरीष्ठ लिपिक बंडु चौरे, लिपिक चेतन मोरे, इस्माईल मनियार, ऋषीकेश येवले यांच्यासह मीडिया सेंटरमध्ये नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांची बैठे पथकास भेट
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाकरीता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी आज पारोळा चौफुली व नगाव चौफुली येथील बैठे पथकास (एसएसटी) भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर, 2024 रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुका निर्भयपणे पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च निरिक्षक रामा नाथन आर यांची नियुक्ती केली असून निरिक्षकांचे धुळ्यात आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्च निरीक्षक श्री. रामा नाथन आर यांनी आज पारोळा चौफुली व नवाग चौफुली येथील एसएसटी पथकास भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील कामकाजाची माहिती जाणून घेऊन वाहन नोंदवहीचीही तपासणी केली.
यावेळी खर्च निरीक्षक श्री. रामा नाथन आर यांनी बैठे पथक यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबादारी काळजीपूर्वक पार पाडावी, या मार्गाने येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करुन वाहनांच्या नोंदी नोंदवहीत घ्याव्यात, असेही सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर हे उपस्थित होते.