Guardian Minister Dhananjay Munde – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध
शेतकऱ्यांना दिलेल्या लाभाची रक्कम जिल्हा वार्षिक आराखडया पेक्षाही अधिक
हुतात्मा स्मारकास मानवंदनासह मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मुख्य ध्वजारोहण समारंभ साजरा
BEED :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घसघशीत लाभ देण्यात आलेला असून शेतकऱ्यांना दिलेल्या लाभाची रक्कम जिल्हा वार्षिक आराखड्यापेक्षाही अधिक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी केले.
येथील पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी श्री मुंडे बोलत होते. यावेळी अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अर्पीता ठुबे, स्वातंत्र्यसैनिक, समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर समाजसेवक आणि बीडकर जनता मोठ्या संख्येने आजच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित होती.
तत्पूर्वी हुतात्मा चौक येथे स्मारकास 21 तोफांची सलामी देण्यात आली. कृषिमंत्री श्री मुंडे यांनी या ठिकाणी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. स्वातंत्र्य सैनिकांचे प्रतिनिधी म्हणुन कारभारी शिवाजीराव सानप, अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही या ठिकाणी मानवंदना देऊन अभिवादन केले.
आपल्या भाषणात श्री. मुंडे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवाची सांगता आज होत असल्याचे सांगून या संग्रामात आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्यांना श्रध्दांजली अर्पित केली. तसेच उपस्थितांना मुक्ति संग्राम दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. मागील वर्षभरात मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत नव्याने पोहोचण्यासाठी मागील वर्षभरात बरेच कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे सांगीतले.
यावर्षी चांगला पाऊस आला मात्र, कुठे अधिक पावसाने शेतीचे नुकसानही झाले असून स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केल असल्याचे सांगुन नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती मदत करण्यासाठी शासन पावले उचलत असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात 1 हजार 201 योजना दूतांच्या माध्यमातून घराघरात शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. या माध्यमातून आणखी रोजगार संधी निर्माण होत आहेत. काल ईद आणि आज गणरायाला निरोप देणार आहोत या दोन्ही सणांसह येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छाही श्री मुंडे यांनी याप्रसंगी दिल्या.
76 वर्षांपूर्वी मुक्त झालेला मराठवाडा आपली ओळख बदलत आहे. मागासलेला मराठवाडा आणि बीड जिल्हा हे आता इतिहासजमा होऊन प्रगत बीड जिल्हा अशी ओळख समोर करूया असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन अंकुश शेळके यांनी केले.
आज झालेल्या पथ संचलनात पोलीस प्लाटून पुरुष व महिला, होमगार्ड प्लॅाटून पुरुष व महिला यासह बलभीम कॉलेज, के. एस. के. कॉलेज, बंकटस्वामी कॉलेज, बलभीम कॉलेज महिला यांच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले.