Guardian Minister Sudhir Mungantiwar – महिला सक्षमीकरणात बचत गटांचा मोठा वाटा
बचतगटांसाठी चंद्रपूर येथे व्यावसायिक संकुलाची (बाजारहाट) होणार निर्मिती
CHANDRAPUR :- सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचल्यामुळेच स्त्रियांना विविध क्षेत्रामध्ये प्रगती करणे शक्य झाले आहे. आज स्त्री प्रत्येकच क्षेत्रात पुढे जात असून ग्रामीण भागातील महिलासुद्धा आता मागे राहिल्या नाहीत. महिलांचा आर्थिक विकास साधण्यासाठी महिला बचत गट महत्त्वाचे माध्यम आहे. बचतगटांमुळे महिलांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यातून सुरु असलेले उद्योग, व्यवसायांमुळे महिलांच्या विकासाला हातभार लागत असून महिला सक्षमीकरणात बचत गटांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे (माविम) संचालित संकल्प लोकसंचालित साधन केंद्रामार्फत पोंभुर्णा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोडे, अल्का आत्राम, पोंभुर्णाच्या नगराध्यक्षा सुलभा पिपरे, संकल्प लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा अंजू सोयाम, व्यवस्थापक वंदना बावणे, श्वेता वनकर, आकाशी गेडाम,रोहिणी ढोले,नंदा कोटरंगे आदी उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने, मदतीने आणि आशीर्वादाने महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘या क्षेत्राचा आमदार व लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून येथील महिला व नागरिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जात आहेत. महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ प्रयत्नरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे देव्हाऱ्यातील ईश्वराप्रमाणे स्त्रीचा सन्मान आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “नारी से नारायणी तक” हा मंत्र देत देशात बचत गटाचे जाळे उभे करून “लखपती दीदी” ची संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली आहे.’
मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू तसेच शेतकरी गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाच्या जागेवर समृद्ध बाजारपेठ उभारण्यात येत आहे. या माध्यमातून पोंभुर्णातील महिला बचत गटांमार्फत उत्पादित वस्तू चंद्रपूरच्या बाजारात विक्री करता येणार आहे. त्यासोबतच, चंद्रपुरात कृषीविभागाच्या उपलब्ध असलेल्या जागेवर सुसज्ज सोलर व्यावसायिक संकुल (बाजार हाट)ची निर्मिती करण्यात येत आहे. याकरीता 80 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.’
श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी (SNDT) विद्यापीठाचे उपकेंद्र बल्लारपूरच्या बाजूला 50 एकर जागेवर होत आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून मुलींसाठी तसेच बचत गटातील महिलांसाठी 72 प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने बल्लारपूर येथे 11.50 कोटी रुपयाचे कौशल्य विकास केंद्र सुरू होत आहे. तसेच स्व. बाबा आमटे यांनी निर्माण केलेल्या आनंदवनात कौशल्य विकास केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले. एमआयडीसी मार्फत स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राला अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगमंत्र्याना विनंती करण्यात आली असून या भागातील मुलींना, महिला बचत गटांना तसेच स्वयंसहायता गटांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोंभुर्णा विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपास येत आहे. याठिकाणी पायाभुत सुविधा उभारण्यात आल्या असून पोंभुर्णामध्ये रोजगाराच्या आणखी व्यापक संधी उपलब्ध होणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
महिलांसाठी विविध योजना : शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील 4 लक्ष 70 हजार महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे. त्यांच्या खात्यात 1500 रु. उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता पर्यत चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लक्ष 75 हजारच्या वर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या मिळालेले आहे. एसटीतून प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली असून 75 वर्षांवरील ज्येष्ठांना 100 टक्के बस प्रवासात सूट देण्यात आली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील माविमशी संलग्नीत बचत गट तसेच इतर गटांना उत्तम चर्चा संवादाचे एक ठिकाण उपलब्ध करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. महिलांनी उत्तम काम करून पोंभुर्णाचा गौरव वाढवत चंद्रपूर जिल्हा देशामध्ये महिला सशक्तीकरणात प्रथम क्रमांकावर राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.