Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल
MUMBAI :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून आज २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असून २९ ऑक्टबर नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबर रोजी होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.