MIT ADT – एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा संपन्न
सायबर नाॅट्स, साईनसेन्स संघांना विजेतेपद
PUNE :- येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, (MIT University of Art, Design and Technology) पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) स्पर्धेच्या हार्डवेअर व सॉफ्टवेअर गटाच्या अंतिम फेरीनंतर स्कुल ऑफ कंम्पुटींगच्या सायबर नाॅट्स व साईनसेन्स या संघांनी नाविन्यपूर्ण कल्पनांसह आपापल्या गटातील विजेतेपदाला गवसणी घातली.
सायबर नाॅट्स संघात आदिल देवकर, झोया पठाण, प्रणव बुलबुले, मोहित पोकळे, सोहम बागुल, अमन खान या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ज्यांना प्रा. प्रणव चिप्पलकट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. तर साॅफ्टवेअर गटातील विजेत्या साईनसेन्स संघात चैतन्य पगारे, अनिंदिता संझगिरी, आयुषमान मिश्रा, ओम बनकर, पारस साळुंखे, स्पर्श महाजन इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यांना प्रा.दिशा गभाने यांचे मार्गदर्शन लाभले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी साॅफ्टवेअर गटात ४०० तर हार्डवेअर गटात १८३ संघांनी सहभागी होताना आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रदर्शन केले. त्यामध्ये अंतिम फेरीत विविध स्तरांवर प्रत्येक गटातील विजेत्या संघाच्या नवकल्पनांचे परिक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांच्या नवकल्पनांना विद्यापीठाकडून करंडक तसेच रोख पारितोषिके देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या व प्रथम तीन संघांना आता राज्यपातळीवर विद्यापीठातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संंधी मिळणार आहे.
याप्रसंगी, एमआयटी एडीटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डॉ.सुनीता कराड, शैलेंद्र गोस्वामी, सुनील कुलकर्णी, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल केंद्र प्रमुख डाॅ.रेखा सुगंधी, डाॅ.विरेंद्र भोजवाणी, डाॅ.सुरेश कापरे आदी मान्यवर उपस्थित होते.