MIT-ADT University News: ‘एमआयटी एडीटी’चा ४८+ कंपन्यांशी सामंजस्य करार
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड म्हणाल्या की, नवीन शिक्षणपद्धती स्विकारून संशोधन, नवकल्पनांची जोड असणाऱ्या उद्योजकतेचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव तर मिळेलच सोबतच त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल व देशाच्या प्रगतीला हातभार लागेल.
Pune :- सध्याच्या शिक्षण पद्धतीत आपण मागणीपेक्षा पुरवठा जास्त करत आहोत. त्यामुळेच बाजारात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. परंतू आता नवीन शिक्षणपद्धती स्विकारून संशोधन, नवकल्पनांची जोड असणाऱ्या उद्योजकतेचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव तर मिळेलच सोबतच त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल व देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड यांनी व्यक्त केले.
त्या एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४८ हून अधिक नामवंत कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींसह प्र.कुलगुरू डाॅ. मोहित दुबे, डाॅ. विरेंद्र शेटे, डाॅ.स्वाती मोरे, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.सपना देव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डाॅ.कराड पुढे म्हणाल्या की, नवीन शैक्षणिक धोरणात(एनईपी) विद्यार्थ्यांमधील संशोधन व उद्योजकतेवर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. एनईपीची देशभरात घोषणा होण्यापूर्वीच एमआयटी एडीटी विद्यापीठाने संशोधन व उद्योजकतेवर भर देणाऱ्या अभ्यासक्रमांची अंमलबजावनी केलेली आहे. एआय सारख्या नवतंत्रज्ञान वर आधारीत कौर्सेसची माहिती देखील विद्यार्थ्यांना सातत्याने देण्यात येत असते. विद्यापीठाने यापूर्वीच टाटा मोटर्स, अँपल सारख्या कंपन्यांसोबत करार केलेले आहेत. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून यावर्षी ४८ हून कंपन्यांशी सामंजस्य करार करत आहोत. ज्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
यावेळी, प्रा.डाॅ. दुबे म्हणाले, सध्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना सोबतच सुशिक्षित बरोजगारांच्या संख्येतही भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे, पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. त्याच्याच एक प्रयत्न म्हणून आम्ही देशभरातील नामवंत कंपन्यांना सामंज्यस्यासाठी साद घातली, ज्याला ४८ हून अधिक कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे, विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने यापूर्वीही अनेक उद्योजक घडविले असून आज केलेल्या करारामुळे त्यामध्ये निश्चितच मोठी भर पडेल.
दीपप्रज्वलन व विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.दुबे यांनी तर आभार डाॅ.छबी चव्हाण यांनी मानले.