MIT University – ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा सोमवारी ७वा दिक्षांत समारंभ
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत २९७२ विद्यार्थ्यांना बहाल होणार पदवी
PUNE :- एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ (MIT University of Art, Design and Technology), विश्वराजबाग, पुणेच्या ७व्या दिक्षांत समारंभाचे सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वा. आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मा.श्री.सी.पी.राधाकृष्णन (मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली लोणी काळभोर येथे पार पडणार आहे. यंदा विद्यापीठातील २९७२ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार आहे.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ, गांधीनगर, गुजरातचे कुलगुरू, पद्मश्री डॉ.जयंतकुमार एम.व्यास यांना विज्ञान व तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाने सन २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. यंदाच्या दिक्षांत समारंभात, २२ विद्यार्थ्यांना पीएचडी, ५३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर १९४ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांसह जवळपास ८ हजारपेक्षा अधिक लोक देशभरातून उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाने परीक्षेसाठी संपूर्ण डिजीटल प्रणाली अवलंबली असून, त्यामुळे परिक्षेची अंमलबजावणी निर्विघ्न होते. यासह वेळेत अचून निकाल व सर्व प्रक्रियेतील पारदर्शकता ही ‘एमआयटी एडीटी’ची आता ओळख बनली आहे.
विद्यापीठाच्या आजपर्यंत झालेल्या ६ दिक्षांत समारंभात मा. श्री.नितीनजी गडकरी, श्री.विनोदजी तावडे, इस्त्रोचे माजी चेअरमन पद्मविभूषण डॉ. जी. माधवन नायर, राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डीआरडीओचे माजी चेअरमन डॉ.जी.सतीश रेड्डी, इस्त्रोचे विद्यमान चेअरमन डॉ.एस. सोमनाथ यांनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे यंदा आम्ही राज्यपाल मा.श्री.सी.पी.राधाकृष्णन यांचे विद्यापीठात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत, अशी माहिती विद्यापीठाचे, प्र.कुलगुरू प्रा.डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ.ज्ञानदेव नीलवर्ण, मानवविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता प्रिया सिंग यांनी यावेळी दिली आहे.