NCP Abha Pandey – “दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार”; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती असो वा महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधीच अनेक इच्छुक मतदारसंघात निवडणूक लढायचीच असा चंग बांधून आहेत. त्यातच नागपूर पूर्व मतदारसंघ हा नेहमी भाजपासाठी अनुकूल मानला जातो. याठिकाणी महायुती आणि भाजपाला चांगली आघाडी मिळते. परंतु यंदा अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे महायुतीला या जागेचा निर्णय अडचणीचा ठरणार आहे.
नागपूर पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी नगरसेविका आणि नेत्या आभा पांडे या निवडणुकीसाठी सज्ज आहे. त्याबाबत तयारीही सुरू केली आहे. याबाबत आभा पांडे म्हणाल्या की, लोकशाही आणि राजकारणात जनता सर्वोतोपरी असते. जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. भाजपा दावा सोडेल किंवा नाही हा त्यांचा विषय मात्र मी मैदानात उतरणार आहे. नितीन गडकरींना या मतदारसंघात लीड मिळाली ती त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कामाच्या पद्धतीमुळे मिळाली आहे. लोकसभेच्या निकालावरून विधानसभेचं गणित मांडता येत नाही. लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे सगळ्यांना माहिती आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, संपूर्ण नागपूरचा कचरा हा पूर्वमधील भांडेवाडीला येतो, आजपर्यंत यासाठी आमदारांनी काय केले. एकही प्रश्न तुम्ही भांडेवाडीबाबत विधानसभेत मांडले नाहीत हे तुमचे अपयश आहे. ३०० बेड हॉस्पिटल आणलं, स्मार्ट सिटी त्यात लोकांची घरे जातायेत. मी जर निवडून आले तर कुणाचेही घर पडू न देता विकासकामे करेन. माझी तयारी ग्राऊंड लेव्हलवर सुरू आहे. काहीही असो मी निवडणूक लढणार आहे असं सांगत राष्ट्रवादी नेत्या आभा पांडे यांनी विद्यमान भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे.