Parvati Assembly Constituency : शक्तिप्रदर्शन करीत माधुरी मिसाळ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पर्वती विधानसभा मतदार संघातून आमदार माधुरी मिसाळ यांनी शक्तिप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

Pune :- सारसबाग येथील गणपती आणि महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मिसाळ यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्केट यार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पद्मावती, अण्णा भाऊ साठे स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक, अहिल्यादेवी होळकर स्मारक या महापुरुषांना अभिवादन केले.

केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार प्रदीप रावत, निवडणूक प्रमुख दीपक मिसाळ, गणेश बिडकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, करण मिसाळ, संतोष नांगरे, प्रशांत दिवेकर, सुधीर कुरुंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरनार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

मोहोळ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. माधुरी ताईंनी या मतदारसंघातील विकास कामांना गती दिली, लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचवल्या, त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे. त्यामुळे त्या मोठ्या बहुमताने विजयी होतील.”

माधुरी मिसाळ म्हणाल्या, सलग चौथ्यांदा भाजपच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. गेली पंधरा वर्षे केलेली विकासकामे आणि सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने विजयी होऊ असा विश्वास वाटतो.