Pune: क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा सत्कार समारंभ
माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्री पद मिळाल्यामुळे त्यांचा क्रिएटिव्ह फाउंडेशन कोथरूडच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
Pune :- पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्री पद मिळाल्यामुळे त्यांचा क्रिएटिव्ह फाउंडेशन कोथरूडच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे मिसाळ यांच्यासोबत घरचे संबंध असल्याने या समारंभाला पारिवारिक स्वरूप आले होते. माधुरी मिसाळ या आमच्या परिवारातील सदस्या प्रमाणे आहेत. त्या आता राज्याच्या आमदार झाल्या असून त्यांच्याकडे नगरविकास,अल्पसंख्यांक विकास व औकाफ, वैद्यकीय शिक्षण,सामाजिक न्याय, परिवहन यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आली आहे. याचा एक परिवार म्हणून आम्हाला झालेला आनंद आम्ही बॅनरबाजीवर पैसे न खर्च करता पुण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थांना उपयोगी साहित्य भेट देऊन साजरा करत असल्याचे फाउंडेशनच्या संदीप खर्डेकर यांनी सांगितले. यावेळी, शांतीबन वृद्धाश्रम वारजे, नवरत्न वृद्धाश्रम,वडगाव धायरी, स्वामी आंगण वृद्धाश्रम, डोणजे आदी संस्थांना उपयोगी वस्तू व किराणा मालाचे साहित्य देण्यात आले. त्याचसोबत, या संस्थांना पुढील काळात देखील मदत करण्याचे आश्वासन खर्डेकर यांनी केले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणल्या की, माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कौतुकाची थाप नक्कीच हवी असते. त्यात जर ही कौतुकाची थाप आपल्या जवळच्या लोकांकडून असेल तर त्याचा आनंद जास्त असतो. इथे उपस्थित सर्व जण माझ्या अतिशय जवळचे आहेत. माझ्या वैयक्तिक जीवनापासून ते माझ्या राजकीय जीवनापर्यंतचा प्रवास या लोकांनी अतिशय जवळून पाहिला आहे. मला सरकारकडून मिळालेल्या खात्यांची जबाबदारी पार पाडताना मी पुण्याच्या विकासासाठी नक्कीच कटिबध्द आहे.