Pune Congress Committee President Arvind Shinde – महात्मा गांधीचे विचार कधीच संपू शकत नाही
PUNE :- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज शास्त्री पुतळा, दांडेकर पूल ते गोपाळकृष्ण गोखले पुतळा, फर्ग्युसन कॉलेज रोड पर्यंत “महात्मा गांधी विचार दर्शन रॅली” काढण्यात आली. तसेच काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार म्हणाले की, ‘‘अनेक देशांनी महात्मा गांधींच्या विचारांना मानले आहे. पण काही प्रवृत्तींकडून गांधींच्या मृत्यूनंतरही गांधींना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधींनी मानवता, समता आणि नैतिकता या तीन मूलभूत मूल्यांवर भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. शांततेच्या मार्गाने जनशक्तीचे दर्शन जगाला घडवून दिले. शेवटच्या माणसांचा प्रथम विचार गांधींनी केला. आज विविध मार्गांनी महात्मा गांधी यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, ही मोठी खंत आहे. भारताचे सर्वोच्च नेतेही परदेशात गेल्यावर तुमचे नाव घेऊन तुमच्या पुतळ्याला वंदन करतात, मात्र काही अंधभक्त गांधींच्या विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही मूठभर लोकांच्या कृत्यामुळे गांधींजी आपल्याला वेदना होत असतील, आम्ही आपली क्षमा मागतो.’’
यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधी ज्यावेळी ज्यावेळी जे बोलायचे तसेच आचरण करायचे. आपल्या प्रत्येकामध्ये एक महात्मा गांधी आहे आणि तो आपण आचरला पाहिजे. महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधात जी आंदोलने केली ती सर्व शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने केली. आज काही मूठभर समाज कठंक धार्मिक जातीय तेढ निर्माण करून देशाचे सार्वभैमत्व आणि अखंडत्वाला धक्का लावण्याचे काम करीत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिक म्हणजेच महात्मा गांधी हे आहेत. ‘शब्दांमध्ये वाईटाचे चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते’, असा विश्वास बाळगणार्या गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा, नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी नेहमी सगळ्यांना संगितले. देशातील लोकशाही ही अबाधीत राहिली पाहिजे. जे लोक लोकशाहीला बाधा आणण्याचे काम करीत आहे त्यांना आपण रोखले पाहिजे. जर अशा समाज कंठकांना रोखले नाही तर पुढच्या काळात आपल्या पुढच्या पिढीला मुक्तपणे राहता येणार नाही.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘साम्राज्यवादी ब्रिटीशांनकडून केवळ देशाला स्वातंत्र मिळून दिले नाही तर राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया देखील स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून महात्मा गांधींनी केली. आज जगामध्ये चालू युध्द पाहिल्यानंतर अहिंसेच्या तत्वज्ञानाची किती नितांत गरज आहे हे आपण समजू शकतो.
निरनिराळे लढे असहकार, अहिंसा, सत्याग्रह या तत्वांवर आधारित आपण कसे यशस्वी होवू शकतो हे गांधीच्या जीवनाकडे पाहिले तर आपल्या लक्षात येते. या मूल्यांचा आधार घेवून अफ्रिकेतील काही राष्ट्र स्वातंत्र्य मिळवू शकले आहेत. त्यांच्या आचाराचा व विचाराचा प्रचार करण्याची आजही गरज असून तरूण पिढीने त्यातून बोध घेणे गरजेचे आहे.’’
यानंतर नगरसेवक अविनाश बागवे यांनीही आपले महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या विषयी बहुमोल विचार व्यक्त केले.
या मिरवणुकीमध्ये महात्मा गांधी – लालबहाद्दूर शास्त्री, महात्मा गांधी – कस्तुरबा गांधी, मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, चंपारण्य सत्याग्रह, चले जाव चळवळ, पुणे करार आदी विषयांवर चित्ररथ तयार केले होते. या यात्रेमध्ये शारदा विद्यालय (इंग्रजी माध्यम), वसंतराव विद्यालय, प्रियदर्शनी शिक्षण संस्था, न्यू मिलियम स्टार या शाळेतील मुलांनी गांधींजीच्या आयुष्यातील महत्वांच्या घटना, गांधीजी व त्यांच्या समकालिन नेत्यांच्या वेशभुषा परिधान करून साकारण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे संयोजन महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष नीता रजपूत व गणेश भंडारी यांनी केले होते.
यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी आमदार उल्हास पवार, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, महिला अध्यक्षा पुजा आनंद, नगरसेवक लता राजगुरू, रफिक शेख, अविनाश बागवे, अजित दरेकर, मुख्तार शेख, अविनाश साळवे, उस्मान तांबोळी, कैलास गायकवाड, भीमराव पाटोळे, जेंद्र भुतडा, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, अक्षय माने, आसिफ शेख, विशाल जाधव, राज अंबिके, संदिप मोरे, मिलिंद अहिर, चैतन्य पुंरदरे, महेश हराळे, अभिजीत महामुनी, फैय्याज शेख, शाम काळे, संदिप मोरे, सचिन दुर्गोडे, ज्योती परदेशी, सुंदरा ओव्हाळ, नलिनी दोरगे, अजय खुडे, नरेंद्र खंडेलवाल आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.