Pune Rastapeth Mahavitaran – पीएम सूर्यघर मोफत वीज योजना प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
PUNE :- महावितरण, केंद्र सरकारचे ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (आरईसी) आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने रास्तापेठ येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून घरांना किंवा गृहनिर्माण सोसायट्यांना प्रति किलोवॅट सुमारे १२० युनिट मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रदर्शनाला मंगळवारी (२४ सप्टेंबर) दिवसभर नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. .
महावितरण, केंद्र सरकारचे ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (आरईसी) आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने रास्तापेठ येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरईसीच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी श्रीमती सरस्वती (मुंबई), अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, अनिल घोगरे, ‘मस्मा’चे अध्यक्ष शशिकांत वाकडे, समीर गांधी, जयेश अकोले आदी उपस्थित होते.
अर्ज सादर करण्यापासून ते छतावरील सौर प्रकल्प सुरू करण्यापर्यंत पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला होता. योजनेच्या लाभाचे प्रात्यक्षिक, सहभागासाठी संकेतस्थळावर अर्ज सादर करणे, एजन्सीची निवड, छतावर सोलर ॲरे बसवणे, मीटर बसवणे आदींसह नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. योजनेच्या माहितीपत्रकांचेही वाटप करण्यात आले. पीएम सूर्यघर योजनेची माहिती देण्यासाठी महावितरणने आयोजित केलेले हे राज्यातील पहिलेच प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून या योजनेबाबत वीज ग्राहकांशी थेट संवाद साधला जाणार असल्याचे मत मुख्य कार्यक्रम अधिकारी श्रीमती सरस्वती यांनी व्यक्त केले. या प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून उपकार्यकारी अभियंता डॉ.संतोष पाटणी यांनी काम पाहिले.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत, घरगुती ग्राहकांना 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांद्वारे दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट मोफत वीज मिळण्याची संधी आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. त्यानुसार महावितरणकडून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरीसह योजनेची विविध माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली, महावितरणकडून सोलर नेट मीटरही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.