Sanjay Raut’s Accusation – “मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर”
MUMBAI :- बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. या प्रकरणी राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एन्काउंटर प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा प्रकार संशयास्पद आहे. एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर होणे यात हळहळण्यासारखे काही नाही. पण, हा एन्काऊंटर मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी झाला आहे.
“पोलिसांना किंवा सरकार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचं आहे. त्यासाठी त्यांनी मुख्य पुरावा नष्ट केला. आता प्रश्न असा आहे की हजारो लोक बदलापूरात रस्त्यावर उतरुन आरोपीला फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या असं सांगत होती. तेव्हा दुसऱ्या दिवशी फडणवीस म्हणाले कायदा हातात घेऊ देणार नाही. मग दुसऱ्याच दिवशी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन अटक का केली? ते गुन्हे आधी मागे घ्या. ज्यांच्यावर पोक्सो कायद्याने गुन्हे दाखल आहेत, त्यांना अजून अटक का केली नाही? असा सवाल राऊत यांनी केला.
“शाळेतील सीसीटीव्ही फुटेज का काढून टाकले? नेमके त्या काळातीलच का काढले? संस्थाचालकांनी काढले आहेत. संस्थाचालक हे भारतीय जनता पक्षाशी, एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधीत आहेत.
बलात्काऱ्यांना अशा प्रकारच्या शिक्षा व्हायला पाहिजेत. या विषयी आमचे दुमत नाही, पण कोणाला तरी वाचवण्यासाठी हा बनाव आणि हे कथानक रचले आहे, असंही राऊत म्हणाले. महाराष्ट्रात सध्या मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी आंदोनल सुरू आहे. त्याच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे केले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.