Sassoon General Hospital – ससूनमध्ये 4 कोटींचा अपहार
रुग्णालयातील 16 कर्मचाऱ्यांचा हात; सर्व जण निलंबित
PUNE :- पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकारांची मालिका सुरूच असून, आता त्यात अजून एकाची भर झाली आहे. ससूनमधील एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने चौकशी केली होती.
ससून मधील तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने हा या प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यासह एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ससूनच्या प्रशासकीय अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार अनिल माने याच्याकडे असताना, जुलै 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत हा गैरव्यवहार झाला. या काळात प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बँक खात्यातील व्यवहाराचे अधिकार माने याच्याकडे होते. या खात्यातील 4 कोटी 18 लाख रुपये त्याने रुग्णालयातील 16 कर्मचारी आणि 8 खासगी व्यक्तींच्या खात्यावर वेळोवेळी जमा केले. नंतर या कर्मचाऱ्यांनी हे पैसे एकाच कर्मचाऱ्याच्या खात्यावर पुन्हा जमा केले. या बदल्यात सर्व कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ससूनमधील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचा वरदहस्त असल्याशिवाय एवढा मोठा गैरव्यवहार होणे शक्य नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या गैरव्यवहाराच्या कालावधीत अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर आणि डॉ. विनायक काळे हे होते. त्यामुळे त्यांच्याकडेही संशयाची सुई वळली आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी या प्रकरणी वरिष्ठांचा सहभाग तपासावा, अशी मागणी ससूनमधून होत आहे.