Wardha MIDC – पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजन
AMRAVATI :- नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे उद्या शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे ई-भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे पार पडणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर यांनी केले आहे.
पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रीजन्स ॲड अपेरल (PM MITRA)पार्क अमरावती या प्रकल्पाची किंमत 703.23 कोटी रुपये एवढी आहे. या टेक्स्टाईल पार्कला विकसित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत विकास भांडवल अर्थसहाय्य 200 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हा प्रकल्प 1076.80 हेक्टर जमिनीवर विकसित झालेल्या अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे सदर पार्क निर्माण होणार आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये जलद गतीने उद्योग स्थापन होण्यासाठी प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी प्रति पार्क 300 कोटी रुपयांची तरतूद आहे. एकात्मिक टेक्सटाईल पार्कच्या स्वरूपात विशेषतः महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होतील. या प्रकल्पातून 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे तसेच एक लाखांपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती होणार आहे.